लोक बिरादरी प्रकल्प, ज्याचे बोधवाक्य आहे, "काम निर्माण करते, दान उद्धवस्त करते", भामरागड तालुका आणि त्याच्या आसपासचे रहिवासी, माडिया, गोंड इ. यांच्या समग्र विकास आणि सशक्तीकरणासाठी प्रयत्न करते. त्यांना आत्मनिर्भर करण्यासह, त्यांना जवाबदार नागरिक बनविणे, त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे आणि त्यासाठी उभे राहण्यास त्यांना सक्षम बनविणे, हेच आमचे स्वप्न आहे.
आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणीय जागरूकता यांमार्फत लोक बिरादरी प्रकल्प समाजातील शाश्वत बदलासाठी उत्प्रेरक म्हणून कार्य करण्यावर विश्वास ठेवतो. हा विश्वास ४५ वर्षांच्या सशक्त भावनिक संबंधांवर आधारित आहे.
'बाबा आमटे' या नावाने लोकप्रिय असलेले मुरलीधर देविदास आमटे यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी झाला. ते थोर मानवतावादी, पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्ते व ज्ञानी कवी होते. व्यवसायाने वकील असलेले बाबा गरीब आणि श्रीमंत ह्यातील फरक जाणून घ्यायला निघाले होते. त्यांनी अस्पृश्यांच्या आश्रमापासून सुरुवात केली जिथे सर्वजण सामाजिक उतरंड असणारे नियम तोडून काम करत. पण आयुष्यात काही तरी वेगळेच लिहून ठेवले होते, आणि म्हणूनच तो प्रकल्प अपयशी ठरला. एके दिवशी त्यांना रस्त्याच्या बाजूला एक कुष्ठरोगी काशीराम पडलेला दिसला. त्याच्या जखमांमध्ये जंतू होते व त्याचा दुर्गंधही येत होता. बाबा ते बघताच घाबरले. त्यांनी काशीराम वर चादर टाकली. या प्रसंगाने त्यांच्या जीवनाला वेगळे वळण दिले आणि त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन कुष्ठरोगाने ग्रस्त असलेल्या लोकांच्या पुनर्वसन आणि सशक्तीकरणासाठी समर्पित केले. सन १९५१ मध्ये बाबांनी आनंदवनाची स्थापना केली जो आज एक स्वयंचलित समुदाय आहे. इ.स. १९६७ मध्ये त्यांनी सोमनाथ कृषी प्रकल्प तसेच, मध्ये १९७३ साली लोक बिरादरी प्रकल्पाची स्थापना केली.
गांधीवादी असलेल्या बाबांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय भूमिका पार पाडली. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य निराधार लोकांसाठी समर्पित केले. सर्व भारतीयांमध्ये शांती आणि ऐक्य स्थापन करण्यासाठी बाबांनी “भारत जोडो” ही असामान्य चळवळ सुरु केली. त्यांचे एक परिपूर्ण, सार्वभौम राष्ट्राचे स्वप्न होते आणि त्यांनी लोकांना सहभागी होण्याचे आव्हान देखील केले. त्यांना मिळालेला प्रतिसाद अद्वितीय होता. ज्या राज्यात ते गेले तेथे त्यांचे प्रेमाने व कौतुकाने स्वागत केले गेले, राष्ट्र आणि मानवतेसाठी कित्येक अंतःकरणे करुणा व प्रेमाने भरून गेली.
प्रकल्पाची कल्पना रुजली ती एका साहसी सहली दरम्यान. MBBS ची शेवटची परीक्षा देऊन जेव्हा बाबांची दोन्ही मुले [डॉ. प्रकाश आणि डॉ. विकास ] सुट्टीसाठी घरी परतली तेव्हा बाबा त्यांना भामरागड ला सहलीच्या निमित्ताने घेऊन आले. जेमतेम २५० किमी चा तो रस्ता पार करायला जवळपास ३ दिवस लागले. तरुणपणी शिकारीच्या निमित्ताने बाबा येथे येऊन गेले होते; पण या सहली दरम्यान त्यांच्या मनात काही वेगळेच दडले होते. तिथल्या स्थित आदिवासी समाजाची हलाखीची परिस्थिती त्यांना अस्वस्थ करत होती. भामरागडच्या दुर्गम भागात 'माडिया-गोंड' ही अतिशय मागासलेली आदिवासी जमात वास्तव्य करून आहे . कशीबशी लाज झाकावी एवढी वस्त्रं आणि रंगीत मणी परिधान करणारी ही माणसे! संपूर्ण कपडे घालणाऱ्या माणसांना पाहून हे लोक घाबरून दूर जंगलात पळून जात असत. इथले समाजजीवन हे निरक्षरता आणि शोषणाने ग्रासलेले आणि भयंकर दुर्लक्षित होते
बाबांना इथे सुधारणेची, सुविधांची खूप आवश्यकता वाटत होती. ध्येयवेड्या वृत्तीच्या बाबांनी या दृष्टीने इथे प्रकल्प उभारण्याचे ठरवले. वयाच्या साठाव्या वर्षी बाबांनी दाखवलेली ही जिगर, हे साहस पाहून डॉ. प्रकाशने तत्काळ एक निर्णय घेतला - प्रकल्पाची धुरा वाहण्याचा. प्रकाशची धाकटी बहीण रेणुका आणि अजून ४ सुशिक्षित तरुण या कार्यासाठी पुढे आले. त्यावेळी ते सर्वच जण अनभिज्ञ होते, साहसी आणि निस्वार्थी वृत्तीने उभ्या राहिलेल्या प्रकल्पाच्या आजच्या स्वरूपास!