१९७३ पासून लोक बिरादरी रुग्णालय, हेमलकसा स्थानिक आदिवासींना सेवा देत आहे. दरवर्षी ३ राज्यांतील (महाराष्ट्र, छत्तीसगढ, तेलंगाणा) ४० हजारांहूनही जास्त रुग्णांवर उपचार केले जातात, ज्यांत विशेष सेवांचादेखील समावेश होतो.
पण असं लक्षात आलं की बऱ्याच वेळा रुग्ण खराब रस्ते, सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा अभाव, मुसळधार पाऊस अशा विविध कारणांमुळे वेळेवर रुग्णालयात पोहोचू शकत नव्हते. काही गावं तर रुग्णालयापासून फार दूर आहेत (२५-३० कि.मी.), जी मान्सूनमध्ये नदी-नाल्यांना येणाऱ्या पुरामुळे इतर गावांपासून पूर्णपणे तोडली जातात. सर्दी, खोकला, ताप, अतिसार अशा आजारांवरील उपचारांसाठी एवढा प्रवास करणं, रुग्णांसाठी फारच त्रासदायक ठरतं. आम्ही असा विचार केला की, या गावांच्या जवळपासच जर आरोग्य केंद्र असेल तर रुग्णांचा वेळ आणि पैसा तर वाचेलच पण त्यांना घरच्याघरी उपचारदेखील मिळतील.
डॉ. दिगंत आमटे आणि डॉ. अनघा आमटे यांनी २०१५ला या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्याचे "सामुदायिक आरोग्य कार्यक्रम" असे नामकरण करण्यात आले. आतापर्यंत ६ आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे, जी साधारण २६ गावातील रुग्णांवर उपचार करतात. या गावांत साधारण १,२२३ घरे आहेत आणि लोकसंख्या साधारण ६,५०० आहे. एका वर्षाची सरासरी पाहिल्यास, १ आरोग्य केंद्र साधारण १,००० रुग्णांवर (साधारण २०० घरे) उपचार करते. आरोग्य केंद्रांची स्थाने पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा आणि अंतरांचे तपशील पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
प्रत्येक केंद्रात एक "सामुदायिक आरोग्य सेवक" (सा.आ.से.) आहे, ज्याची गावकऱ्यांनी एकमताने निवड केली आहे. हे सा.आ.से. साक्षर आहेत आणि त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.
सा.आ.से. नाव | केंद्र | स्थापना वर्ष | केंद्राच्या अखत्यारीतील गावे |
दान्सू पुंगाटी | घोटपाडी | २०१५ |
घोटपाडी दर्भा बोलांगे भटपर |
पाली महाका | पेनगुंडा | २०१५ |
पेनगुंडा महाकपाडी परायणार कुचेर गोंगवाडा |
सुनिता मज्जी | मिडदापल्ली | २०१५ |
मिडदापल्ली नेलगुंडा कवंडे मोरोमेट्टा |
राजेश तळांदे | जिंजगाव | २०१६ |
जिंजगाव रेला मरमपल्ली गोरनूर |
बिरजू दुर्वा | गोपनार | २०१६ |
गोपनार लष्कर होद्री आलदंडी मोरोडपार |
सुधाकर दुर्वा | मिरगुडवंचा | २०१७ |
मिरगुडवंचा पोयरकोठी दोभूर गुंडूरवाही |
निवड झालेल्या सा.आ.से. ना लोक बिरादरी रुग्णालयात प्रशिक्षण मिळते. त्यासाठी ते इथे काही महिने राहतात. नंतरदेखील ते रुग्णालयात मासिक प्रशिक्षणादरम्यान काही दिवस राहतात.
प्रत्येक केंद्रात रक्तदाब मापक, सौरउर्जेवर चालणारा वजन काटा, उंची मापक, स्टेथोसस्कोप, आधुनिक तपमापक, मलमपट्टी साहित्य इ. उपकरणे असतात. ह्या भागात हिवताप संपूर्ण वर्षभर असतो, त्यामुळे हिवतापाचे तात्काळ निदान करणारे वैद्यकीय उपकरणदेखील पुरवले जाते.
सा.आ.से. चे घर सध्या आरोग्य केंद्र म्हणून वापरले जाते. पण, पेनगुंडा येथे लवकरच स्वतंत्र आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात येईल. आम्ही गोपनार येथे फेब्रुवारी २०२० मध्ये आरोग्य केंद्राची स्थापना केली आहे.
केंद्रात येणाऱ्या रुग्णांच्या रोगाचे अनुमान आणि त्यावर उपचार, ह्या सा.आ.से. च्या प्रमुख जवाबदाऱ्या आहेत. जर रोग गंभीर असेल तर सा.आ.से. रुग्णाला लोक बिरादरी रुग्णालयात पाठवतात. केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रत्येक घराला सा.आ.से. ने भेट द्यावी, यासाठी प्रोत्साहन दिले जाते. असे आढळून आले आहे की, अशा भेटी दिल्यावर रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. सा.आ.से. रुग्णांवर घरीच उपचार करतात. या भेटींदरम्यान, ते रोगप्रतिबंध आणि आरोग्यरक्षणासाठी चांगल्या सवयी यावर जोर देतात.
प्रकल्प समन्वयकांच्या मार्गदर्शनाखाली सा.आ.से. "सामुदायिक आरोग्य जागरुकता" सभांचे नियमित आयोजन करतात. सर्व गावकऱ्यांना या सभेचे आमंत्रण असते. गावांत जागरुकता वाढवण्यासाठी हिवताप आणि त्याचा प्रतिबंध, अशुद्ध पाण्यामुळे पसरणारे रोग आणि त्यांचा प्रतिबंध यासारख्या विषयांवर चर्चा केली जाते. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही पल्ली आणि जिंजगाव येथे पाणी शुद्धीकरणाची उपकरणे वितरीत केली आहेत.
या प्रयत्नांचे एक चांगले उदाहरण म्हणजे "हात धुण्याचे यंत्र", जे प्रत्येक केंद्रात बसविण्यात आले आहे. लवकरच प्रत्येक घरात हे यंत्र बसविण्यात येईल. आम्ही एक “साप ओळखण्याचे मार्गदर्शक” देखील बनविले आहे. हा एक विषारी आणि बिनविषारी सापांमधील फरक दाखवणाऱ्या चित्रांचा संच आहे. ह्यामुळे कुठलाही साप चावल्यावर गावकरी घाबरत नाहीत. विषारी सापाची ओळख पटल्यामुळे रुग्णावर अचूक उपचार होतात आणि एक मौल्यवान जीव वाचविण्यास मदतच होते.
स्थानिकांना नियमित दिनदर्शिका समजत नाही. त्यामुळे त्यांच्या वैद्यकीय उपचारांचे वेळापत्रक बनविताना खूप अडचणी येतात. ही समस्या खासकरून गरोदर स्त्रियांबाबतीत प्रकर्षाने दिसून आली आहे. यावर उपाय म्हणून आम्ही स्थानिक सण-उत्सव-तिथी यानुसार एक "स्थानिक दिनदर्शिका" बनविली आहे. ती पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
या भागात प्रामुख्याने हिवताप, खरुज, Sickle Cell Anaemia इ. रोग होतात. अशुद्ध पाण्यामुळे होणारे विषमज्वर, पटकी असे आजारही इथे नेहमीच दिसतात. उच्च रक्तदाब, तोंडाचा कर्करोग यांसारख्या संसर्गजन्य नसलेल्या आजाराने पीडित रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कुपोषण (nutritional anaemia) आणि अस्वच्छता यामुळेही बरेच जण आजारी पडतात.
जंगली प्राण्यांकडून हल्ला हीदेखील एक मोठी समस्या आहे. सर्पदंश, विंचूदंश, रानटी डुक्कर आणि अस्वलांकडून झालेल्या हल्ल्यामुळे अनेक जण जखमी होतात. बऱ्याचवेळा जीवदेखील गमावतात.
निरक्षरता ही या भागातील एक मोठी समस्या आहे. इतर सामाजिक समस्यांमध्ये दारू, तंबाखू-खर्रा-गुटखा सेवन, धूम्रपान यांचा समावेश होतो. येथे अंधश्रद्धा आजही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कुठल्याही आजारासाठी डॉक्टरऐवजी पुजाऱ्याकडे जाणे लोक पसंत करतात.
प्रत्येक सा.आ.से. ला एक टॅबलेट पी.सी. देण्यात आला आहे, ज्यात "आरोग्यदूत" नावाचे App आहे जे समन्वय फाऊंडेशन, बेंगलुरू यांनी विकसित केले आहे. या App मध्ये सा.आ.से. रुग्णाची वैयक्तिक माहिती, रोगाची लक्षणे, वैद्यकीय चाचण्यांचे तपशील इ. ची नोंद करतात. संपूर्ण माहिती नोंदवल्यानंतर, हे App औषधे आणि त्यांचे डोस यांचे तपशील दाखवते. सा.आ.से. नी नोंदवलेली माहिती App मध्ये जतन केली जाते. महिनाअखेर ही माहिती रुग्णालयाच्या मुख्य डेटाबेसबरोबर विश्लेषणासाठी समक्रमित (synchronize) केली जाते.
सा.आ.से. ने दिलेली औषधे घेतल्यानंतरही रुग्ण बरा झाला नाही तर सा.आ.से. एका पावतीवर सर्व माहिती भरतात आणि रुग्णाला ती घेऊन लोक बिरादरी रुग्णालयात जाण्याची विनंती करतात. ह्या पावतीवरील माहिती एवढी विस्तृत असते की स्थानिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनीही ह्याची प्रशंसा केली आहे. जर रुग्णाची अवस्था गंभीर असेल तर सा.आ.से. रुग्णवाहिकेसाठी रुग्णालयात फोन करतात.
सा.आ.से. जन्म-मृत्यू नोंदणी, बाळंतपणाचे तपशील, रुग्ण नोंदणी इ. दस्तऐवज ठेवतात. त्यांच्याकडे एक दैनंदिनीसुद्धा असते. मासिक अहवालात हे सर्व तपशील आकड्यांच्या स्वरुपात सारांशरूपाने दाखविले जातात.
लोक बिरादरी रुग्णालयात एक "sanitary napkin" उत्पादन केंद्रदेखील आहे. सध्या महिला सा.आ.से. यांचे वितरण करतात. प्रत्येक संचाची किंमत फक्त १५ रुपये आहे, ज्यात १० napkins असतात. ह्या माफक दरातील जैवविघटीत sanitary napkins मुळे स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान स्वच्छता ठेवण्यास मदत होते.
सर्व सा.आ.से. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी लोक बिरादरी रुग्णालयात येतात. ते कामाचा तपशील देतात आणि त्यांना काही दिवसांचे प्रशिक्षणही दिले जाते. प्रकल्प समन्वयक आरोग्यासंदर्भात नवीन विषयांवर प्रशिक्षण देतात.
रुग्णालय सा.आ.से. साठी शैक्षणिक सहलींचेदेखील नियमितपणे आयोजन करते. डिसेम्बर २०१७ ला, आम्ही जन स्वास्थ्य सहयोग (JSS) या बिलासपूर येथील एका संस्थेला भेट दिली. सा.आ.से. नी येथे JSSचा सामुदायिक आरोग्य प्रकल्प बघितला.
२०१६ला, डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे यांनी खासकरून शाळेतील मुलांसाठी एक आरोग्य कार्यक्रम सुरु केला. त्याचे नाव आहे SHAPE (School Health Awareness Programme). त्यात खालील विषय समाविष्ट केलेले आहेत.
आतापर्यंत भामरागड जिल्ह्यातील १२ शाळांत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, ज्यात लोक बिरादरी आश्रम शाळा, हेमलकसा आणि साधना विद्यालय, नेलगुंडा यांचादेखील समावेश होतो. २०१७ला, SHAPE पुस्तिकेचे वितरण भामरागड जिल्ह्यातील सर्व शाळांत करण्यात आले.
लोक बिरादरी रुग्णालयातील सामुदायिक आरोग्य केंद्राच्या काही आगामी योजना :
पण अजूनही वैद्यकीय सेवा पुरविताना किंवा रुग्णांपर्यंत पोहोचताना आम्हांला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भागात “खराब रस्ते” ही एक मोठी समस्या आहे. पावसाळ्यात तर ही समस्या अजूनच गंभीर होते. बऱ्याच सुदूर गावांत अजूनही वीज आणि मोबाईल नेटवर्क नाही. अंधश्रद्धेचे प्रमाणही खूप आहे.
आमच्या सामुदायिक आरोग्य सेवकांच्या सोबतीने यातल्या अनेक समस्यांवर आम्ही भविष्यात मात करू, असा आम्हांला पूर्ण आत्मविश्वास आहे !!