शाळेची सुरुवात

हेमलकसा व त्या शेजारील परिसर नैसर्गिक संसाधनांनी परिपूर्ण होता तसेच माडिया या आदिवासी जमातीची घरे देखील होती. जरी या जमाती वनात आनंदाने नांदत असल्या तरी त्या कपडे, शेती, आरोग्य व शिक्षण या गोष्टींपासून वंचित होत्या. माडिया गोंड जमात तर मूलभूत ग्रामीण सेवांपासून सुद्धा वंचित होती. परिणामी त्यांना कुपोषण, उच्च मृत्यू दर यांचा सामना करावा लागत होता तसेच ते जंगला पलीकडच्या आयुष्यापासून अज्ञात होते. स्वातंत्र्यानंतर वन अधिका‍र्‍यांनी व व्यापार्‍यांनी स्वताःच्या स्वार्थासाठी जंगल उद्ध्वस्त केले आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या शोषणामुळे माडिया जमातीच्या समस्यांची यादी वाढतच गेली. त्यांच्या या अवस्थेमुळे बाबा आमटे शाळा सुरु करण्यासाठी प्रेरीत झाले. त्यांना वाटले की 'शिक्षण' हा असा एकच पर्याय आहे ज्याने जमातीतील लोकांना त्यांच्या परिस्थितीची जाणीव करून देता येईल आणि म्हणूनच परिस्थिती सुधरवण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.

शाळा सुरु करण्याच्या या थोर आणि साध्या कल्पनेला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. जमातीतल्या लोकांना - ज्यांचा समज होता की शिक्षणापासून काहीच लाभ मिळणार नाही, त्यांना विश्वासात घेणे व समजावणे हे सर्वात कठीण कार्य होते. दारो-दारी जाऊन पालकांना विश्वासात घेण्यासाठी आणि त्यांना चांगल्या शिक्षणाचे विविध फायदे पटवून देण्यासाठी लोक बिरादरी प्रकल्पाच्या स्वयंसेवकांनी एक मोहीम चालू केली. शेवटी २५ विद्यार्थ्यांची शाळा एका झाडाखाली सुरु झाली. भाषेची समस्या देखील प्रमुख अडचणींपैकी एक होती. माडिया विद्यार्थ्यांना मराठी किंवा हिंदीचा गंधही नव्हता. म्हणूनच सर्व अभ्यासाच्या साहित्यांची पुनर्रचना माडिया भाषेत करायची होती. चांगल्या सेवा सुविधांचा विकास हे देखील एक आव्हान होते.

ही आव्हाने असूनही शाळेचा विकास झाला, शाळेत जवळपास ६५० विध्यार्थी बालवाडी पासून ते १२ वी च्या वर्गात शिकत आहेत. मुलांना अन्न, निवास, वैद्यकीय सुविधा, गणवेश, लेखन सामग्री, कंगवा, साबण, तेल इ. सर्व आवश्यक सोयी पुरविल्या जातात. १९७६ च्या तुकडीने 'कन्ना मडावी' हा जमातीतील पहिला डॉक्टर घडवला. डॉ. दिगंत आमटे आणि श्री. अनिकेत आमटे जे की पेशाने अनुक्रमे डॉक्टर व अभियंते आहेत यांचेही शिक्षण इथेच झाले. शाळेने बरेच वकील, शिक्षक, डॉक्टर, अभियंते, व वनरक्षक घडवले.


आश्रम शाळा

लोक बिरादरी आश्रम शाळेची (हेमलकसा) स्थापना १९७६ साली झाली. शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात एका झाडाखाली २५ विद्यार्थ्यांसह झाली. आता शाळेत बारावीपर्यंत वर्ग आहेत आणि साधारण ६५० विद्यार्थी आहेत. ही निवासी शाळा असून, साधारण ५५० विद्यार्थी वसतिगृहात आहेत, ज्यांत मुले आणि मुली दोघांचाही समावेश होतो. मुलांच्या वसतिगृहात प्रत्येक खोलीत ८ विद्यार्थी असतात. मुलींच्या वसतिगृहात हीच संख्या १०-१२ आहे.

शाळा सुरु झाली तेव्हा शाळेला कुठलीच पायाभूत सुविधा नव्हती. ती पूर्णपणे स्वयंसेवकांच्या उत्साहावर चालत होती. गेल्या काही वर्षांमध्ये उदारहस्ते मिळालेल्या देणग्यांमुळे शाळा पायाभूत सुविधा प्राप्त करण्यात सक्षम ठरली. स्वयंसेवक आणि शिक्षक यांचा विध्यार्थ्यांबद्दलचा कळकळा आणि परिश्रम हे कौतुकास्पद आहेत.

मुख्य शाळेच्या आवारात दोन इमारती ( प्रत्येक २ मजली ) आहेत.

  • वर्गखोल्यांची संख्या : १३ (बालवाडी ते वर्ग १२ वी)
  • शिक्षकांसाठी आरामशाळा
  • प्राचार्य कार्यालय
  • एक प्रशस्त सभागृह

या इमारती व्यतिरिक्त इथे खालील कारणांसाठी वेगळे विभाग बांधण्यात आले आहेत:

  • विद्यार्थ्यांचे भोजनकक्ष
  • ग्रंथालय
  • संगणक प्रयोगशाळा
  • व्यायामशाळा
  • बालोद्यान

शाळेत राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम शिकविला जातो. शाळेचे माध्यम अर्ध इंग्रजी (semi English) आहे. शाळा २७ जून ते १२ मेपर्यंत भरते. विद्यार्थ्यांना दिवाळीची १५ दिवस आणि होळी व पोळ्याची काही दिवस सुट्टी मिळते.

प्राथमिक आणि माध्यमिक विभागात प्रत्येकी ८ शिक्षक आहेत. लोक बिरादरी प्रकल्पातील १० कार्यकर्तेदेखील शाळेत शिकवितात. मुलांच्या आणि मुलींच्या वसतिगृहात प्रत्येकी एक पुरुष आणि महिला अधिकारी देखरेखीसाठी आहेत.

प्रवेशप्रक्रियेत शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य दिले जाते. एखाद्या गावाचे विद्यार्थी जर शाळेत नसतील आणि अशा गावातून प्रवेशअर्ज आला, तर त्यालादेखील प्राधान्य दिले जाते.

मुलांना जेवण, वैद्यकीय सुविधा, गणवेश, शाळेत लागणारे सर्व साहित्य, फणी, साबण, तेल इ. पुरविले जाते. प्रत्येक वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेशाचे २ संच मिळतात. रात्री घालण्यासाठीदेखील एक पोशाख दिला जातो. हा पोशाख देणगी म्हणून मिळालेल्या कपड्यांतून निवडला जातो. झोपताना लागणाऱ्या सर्व वस्तूंचा संच दिला जातो. यांत हिवाळ्यासाठी घोंगडीदेखील दिली जाते. शाळेसाठी लागणाऱ्या साहित्यात, प्रत्येक विद्यार्थ्याला संपूर्ण अभ्यास सामग्री, पेन, पेन्सील, रंग इ. मिळते. खासकरून खालच्या वर्गातील मुलांना भरपूर कागद आणि हस्तकला सामग्री दिली जाते.

शाळेची वेळ सोमवार ते शुक्रवार ११ ते ५ आणि शनिवारी ७ ते ११ आहे. सर्व विद्यार्थ्यांना पहाटे ५ ला भूपाळीने उठविले जाते, जी विद्यार्थ्यांचाच एक गट गातो. ताजेतवाने झाल्यावर, सर्व विद्यार्थी मैदानावर अर्धा तास शारीरिक प्रशिक्षण घेतात. दरवर्षी साधारण १५० विद्यार्थी तालुकास्तरावर, २५ विद्यार्थी राज्यस्तरावर आणि काही राष्ट्रीय स्तरावर विविध खेळांसाठी भाग घेतात. असे आढळून आले आहे की, विद्यार्थ्यांची निरोगी जीवनशैली आणि अनवाणी लांब अंतर चालून जाण्यासारख्या सवयी त्यांना याबाबतीत फायदेशीरच ठरतात. ह्या विद्यार्थ्यांना ९० मिनिटांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. नाश्त्यानंतर सर्व विद्यार्थी "श्रमदान" करतात. यांत शाळेचा परिसर स्वच्छ करणे, प्लास्टिकचा कचरा उचलणे इ. कामांचा समावेश होतो. यामुळे त्यांची शाळेबद्दल जवाबदारी आणि आपुलकीची भावना वाढीस लागते.

प्रत्येक संध्याकाळी (रविवारीही) ६.१५ ते ७ "परिपाठ" असतो. विद्यार्थी "मेधा मंत्र" या संस्कृत मंत्राचे पठण करतात. काही विद्यार्थी सुविचार सांगतात. रोज स्थानिक भाषेत (माडिया किंवा गोंड) एक गाणे म्हणणे अनिवार्य आहे. पाढेदेखील नियमितपणे म्हंटले जातात. परिपाठाची सांगता "पसायदाना"ने होते.

सर्व विद्यार्थ्यांसाठी रात्री झोपेची वेळ १०.३० आहे.

दररोज प्रत्येक विद्यार्थ्याला नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले जाते. शाळेच्या भोजनगृहात २ सभागृहे आहेत जेथे एकूण ३०० विद्यार्थी बसू शकतात. स्वच्छता राखण्यासाठी भोजनगृह दररोज दोनदा धुतले जाते. भोजनगृहात ५ स्वयंपाकी आणि १ मदतनीस आहेत. भोजनगृहाची क्षमता १६ LPG cylinders ची आहे. पण सध्या फक्त आठच वापरले जातात. चपाती बनविण्याचे यंत्रदेखील आहे. कुकरची क्षमता एका वेळेला ३५ ते ४० कि.ग्रॅ. भात शिजविण्याची आहे.

प्रत्येक वेळेला पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रथम वाढले जाते. नाश्ता सकाळी ६.३०ला सुरु होतो. दुपारच्या जेवणाची सुरुवात सकाळी ९.४५ला (शनिवारी – सकाळी १०.३०) आणि रात्रीच्या जेवणाची सुरुवात संध्याकाळी ६.४५ला होते. १० ते १५ विद्यार्थ्यांचा एक गट जेवण वाढतो. ह्यांची निवड पाचवी ते बारावीच्या वर्गांतून होते.

सर्व विद्यार्थ्यांना महिन्यातून दोनदा अंडी दिली जातात. ताक आठवड्यातून दोनदा दिले जाते. प्रत्येक सोमवारी आणि मंगळवारी दुपारी २ वाजता सर्व विद्यार्थ्यांना ५० ग्रॅमचे चिक्कीचे पाकीट मिळते. इतर दिवशी हंगामी फळे दिली जातात.

शाळेच्या भोजनगृहाला लागणाऱ्या सर्व भाज्या अल्लापल्लीच्या रविवारी आणि भामरागडच्या बुधवारी भरणाऱ्या आठवड्याच्या बाजारातून खरेदी केल्या जातात.


ग्रंथालय

'तुमच्या चांगल्या भविष्यासाठी व यशासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व लिहून ठेवल्या आहेत आणि त्यासाठी फक्त तुम्हाला ग्रंथालयात जावे लागेल!'; म्हणूनच शाळेने विद्यार्थ्यांना ग्रंथालय उपलब्ध करून दिले. मुलांच्या ग्रंथालयाच्या मानकानुसार पुस्तकांचे वर्गीकरण केले गेले आहे, आणि शाळेच्या वेळात ही पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात. पुस्तकांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले आहे:

  • मुलांची क्रियाकलाप पुस्तके
  • कथा पुस्तके
  • कादंबर्या / कल्पित
  • आत्मकथा

संगणक प्रयोगशाळा

शाळेमध्ये अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा आहे. संगणक विंडोज व लीनक्स या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमने व शैक्षणिक सॉफ्टवेअरने सुसज्ज आहेत. विद्यार्थी संगणक प्रयोगशाळेचा उपयोग ई-पुस्तकांचा अभ्यास, ई-वृत्तपत्र वाचणे व फोरम द्वारे एकमेकांशी चर्चा करण्यासाठी करतात. तसेच अनिमेशन चित्रपट व बॉलीवूड मधली गाणे ऐकण्यासाठी देखील करतात. थोडक्यात विद्यार्थी तंत्रज्ञानाचा शिकण्यासाठी तसेच करमणुकीसाठी सुद्धा उपयोग करतात.


विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आलेल्या सुविधा

शालेय साहित्य म्हणून विद्यार्थ्यांना खालील सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत:

  • ३ वेळचे जेवण + १ ग्लास दूध : पोषक आहारावर विशेष लक्ष दिले जाते
  • गणवेश : प्रत्येक विद्यार्थ्याला २ संच
  • बिछाना : हिवाळ्यासाठी उबदार चादरीसह पूर्ण संच
  • शालेय साहित्य : पेन, पेन्सिल, रंग, भरपूर कागदा सहित संपूर्ण साहित्य आणि विशेषतः खालच्या वर्गांसाठी शिल्प साहित्य.

अभ्यासक्रम आणि सुविधा

झाडाखाली भरणाऱ्या शाळेपासून आजची शाळेची सुसज्ज इमारत हा प्रवास थक्क करणारा आहे. आज शिक्षक विद्यार्जनासाठी प्रकल्पात उभ्या केलेल्या अनेक सोयी सुविधांचा पुरेपूर व योग्य वापर करून मुलांचे भवितव्य घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.

सुविधा

दर वर्षी शाळा सुरु होताना जवळपास ३०० प्रवेश अर्ज येतात आणि त्यापैकी ५० मुलांना पहिल्या वर्गात प्रवेश देता येतो. एकूण ६६० मुले या शाळेत जातात आणि दर २५ मुलांमागे १ शिक्षकाची व्यवस्था शाळा आज करते. एकूण मुलांपैकी ४०% मुले ही त्यांच्या घरातील पहिली शाळेत शिकणारी व्यक्ती आहे.

ठराविक फळा-खडू वापरून शिकवण्यापेक्षा नानाविध पद्धती आज शिक्षक वापरत आहेत आणि मुलांना सहज सुंदर शिक्षण पद्धतीचा अनुभव मिळत आहे. तक्ते, चित्रांचा वापर करून पाठांतरावर भर न देता समजून घेऊन विषय शिकवला जातो. 'इंग्लिश रूम' मध्ये जाऊन इंग्रजीत चर्चा करून, मुलांना बोलते करून, इंग्रजीची भीती घालवण्याचा प्रयत्न केला जातो.

शैक्षणिक सॉफ्टवेअरस असलेले सुसज्ज संगणक प्रकल्पाच्या शाळेतील संगणक कक्षात मुलांसाठी उपलब्ध आहेत.मुलांसाठी विविध विषयांनी समृद्ध असे वाचनालय तसेच व्यायामशाळा बांधलेली आहे.


बहुभाषिक शिक्षणपद्धती

माडिया जमात ही द्राविडी समाजातून आल्यामुळे संस्कृतवर आधारित मराठी, हिंदी भाषा समजणे या आदिवासी मुलांना खूप कठीण जाते. शाळेची भीती घालवण्यासाठी; शाळेतील सुरुवातीच्या दिवसात मुलांना रुळता यावे यासाठी आणि शिक्षण व समाज व्यवस्था यांची योग्य सांगड घालण्याच्या दृष्टीने लोक बिरादरी शाळेने 'बहुभाषिक शिक्षण पद्धती' चा अवलंब केला आहे.

स्वतःच्या मातृभाषेचा अभिमान आणि त्याचबरोबर इतर भाषा शिकताना आलेला आत्मविश्वास असा सकारात्मक बदल या शिक्षणपद्धतीमुळे मुलांमध्ये दिसू लागला आहे.

२५ प्रकारच्या छोट्या पुस्तकांमधून खालील प्रकारचे शैक्षणिक साहित्य वापरले जाते:

  • अक्षर तक्ते
  • पक्षी व प्राण्यांचे तक्ते
  • फळ व भाज्यांचे तक्ते
  • दळणवळणाची साधने दर्शवणारे तक्ते
  • दिशादर्शक तक्ते
  • गोष्टींचे ध्वनिमुद्रण
  • गणिताच्या सोप्या संज्ञा

मराठी वाचन, लिखाण सोपे व्हावे यासाठी माडिया भाषेला देवनागरी लिपी वापरून शैक्षणिक साहित्य बनवले आहे. आदिवासी समाजातील शिक्षक या कामासाठी निवडले/तयार केले आहेत जेणेकरून मुलांना उच्चार शिकणे सोपे जावे.

या प्रयत्नांमुळे आता हळूहळू सकारात्मक बदल मुलांच्या वागण्यात, अभ्यासात, वावरण्यात दिसू लागले आहेत. शाळेतून पळून जाण्याचे प्रमाण घटले असून अभ्यासाची आवड मुलांमध्ये दिसू लागली आहे. पूर्वी बुजरी वाटणारी मुले आज आत्मविश्वासाने पाहुण्यांना सामोरी जातात, त्यांच्याशी गप्पा मारतात.


वर्गाबाहेरचे वर्ग!

अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कार्यानुभव सुद्धा देणारी शिक्षणपद्धती जोपासण्यासाठी अनेक उपक्रम इथे राबविले जातात. विद्यार्थ्यांची वर्गशिक्षणाबरोबर सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक जडणघडण व्हावी यादृष्टीने हे उपक्रम आखले गेले आहेत व त्याचबरोबर निव्वळ मनोरंजनासाठी देखील काही कार्यक्रम राबविले जातात.

शाळेच्या भिंती किंवा पायऱ्यांचा एक शिकवण्याचे माध्यम म्हणून अतिशय सुयोग्यपणे वापर केला आहे

  • अक्षाची ओळख व्हावी म्हणून भिंतीवर सम विषम संख्या दाखवणारा अक्ष रेखाटला आहे
  • चढत्या उतरत्या क्रमातील पूर्णांक-अपूर्णांक दर्शवणाऱ्या संख्या, पायऱ्यांचा वापर करून रेखाटल्या आहेत
  • घन/द्रव्य/वायू ची प्रमाणे चढत्या उतरत्या क्रमाने पायऱ्यांवर रेखाटली आहेत
  • संख्यांचे वर्ग/घन भिंतींवर योग्य क्रमाने रेखाटले आहेत

वृक्ष दिंडी

मराठी संस्कृतीत, सणसमारंभात दिंडीस म्हणजे पवित्र पालखी वाहून यात्रेस निघण्यास अनन्य साधारण महत्व आहे. द्रष्ट्या बाबांनी वृक्ष संवर्धनासाठी पालखीत पादुकांऐवजी रोप वाहून दिंडीची अभिनव कल्पना समोर आणली. दिंडीतील विद्यार्थी, पाहणाऱ्यांना उद्देशून वृक्ष संवर्धनाचे आवाहन करतात, त्यावरील रचलेली गाणी एकसूरात गातात आणि वृक्षारोपण करतात. लेझीम, ढोल-ताशाच्या तालावर घोषणा देत रंगीबेरंगी कपडे परिधान करून ही मुले लोकांचे लक्ष वेधून घेऊन झाडे जगवण्याचे महत्व त्यांना पटवून देतात. दरवर्षी साजरा केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाची सांगता नेहमी शेकड्याने वृक्षारोपण करून होते.

दहीहंडी

चोरून लोणी खाणाऱ्या कृष्णाच्या जन्माष्टमी च्या दिवशी लोक बिरादरी शाळेतील मुले मानवी मनोरे रचून उंच ताकाने भरलेले उंच मडके उत्साहाने फोडतात आणि आनंद साजरा करतात. निव्वळ मनोरंजनाबरोबर हा उपक्रम सांघिक प्रयत्नांचे आणि नियोजनबद्ध धोरणांचे महत्व मुलांना पटवून देतो.

गंमत-जत्रा (एक सामाजिक आणि आर्थिक जाणीवा जागृत करणारे अभिनव प्रदर्शन )

सामाजिक बांधिलकीची जाणीव होण्यासाठी मुलांच्या या प्रदर्शनाला जवळपासच्या आदिवासी गावातील बांधवांना आमंत्रित केले जाते. अनेक कार्यक्रम या निमित्ताने सादर केले जातात.

  • विज्ञान प्रदर्शन: विविध प्रतिकृतींच्या माध्यमातून अनेक वैज्ञानिक संकल्पना विद्यार्थी मांडतात. उदाहरणार्थ, जलविद्युत प्रकल्प, वैज्ञानिक पद्धतीने रोपांची लागवड
  • जादूचे प्रयोग: मनोरंजनात्मक कार्यक्रमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न
  • पदार्थांचे स्टॉंल्स: उपलब्ध साधन सामग्रीतून विविध पदार्थ बनवून मुले त्यांचे स्टॉंल्स लावतात. उदाहरणार्थ, मोहाच्या फुलांपासून (ज्याचा ताडी बनवण्यासाठी आदिवासी भागात उपयोग केला जातो ) गोड पदार्थ बनवणे. यातून मुलांना उत्तेजक द्रव्यापासून दूर राहण्याचा संदेश मिळतो
  • इतिहासावर आधारित प्रदर्शन: वेगवेगळ्या युगांवर आधारित वस्तूंचे प्रदर्शन
  • नाट्यछटा आणि पथनाट्ये: विद्यार्थी सामाजिक पैलूंवर भाष्य करणारी नाटके प्रदर्शनात सादर करतात

व्यावसायिक प्रशिक्षण

बांबू हस्तकला प्रशिक्षण आणि शिवणकाम प्रशिक्षणासाठी दर वर्षी काही मुले निवडली जातात आणि त्यांना प्रकल्पावरच हे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. अभ्यासक्रमाबरोबरच या कला जोपासण्यास मिळाल्यामुळे पुढे जाऊन चरितार्थासाठी याचा उपयोग होऊ शकतो. बांबू हस्तकलेत बनवलेल्या वस्तू महाराष्ट्र भर होणाऱ्या विविध प्रदर्शनात मांडल्या जातात.

टाकाऊ तून टिकाऊ

प्रत्येक टाकाऊ वस्तूतून मूल्य शोधण्याची कला मुलांच्या मनावर बिम्बवण्याच्या विचारातून 'स्क्रॅप बँक'ची संकल्पना आकारास आली. स्क्रॅप बँकेचे एक केंद्र प्रकल्पावर उभारण्यात आले आणि मुलांच्या कल्पनाशक्ती ला पूर्ण वाव देण्यात आला. त्यातूनच हॉस्पिटल मधल्या वापरून झालेल्या सिरींजेस वापरून जलविद्युत निलंबनावर आधारित क्रेन, पेंध्यापासून बनवलेल्या शोभिवंत वस्तू अश्या अनेक अभिनव गोष्टी निर्माण झाल्या.

छोटा बाजार

रोजच्या आयुष्यातील पैशांची देवाणघेवाण मुलांना अनुभवता यावी या विचारातून मुलांना प्रकल्पावर तसेच नजीकच्या भामरागड/आलापल्ली गावात छोटा बाजार भरवण्यासाठी उद्युक्त केले जाते. भाजी, फळे तसेच हस्तकलेच्या वस्तू मुले विकण्यास ठेवतात आणि फसवेगिरी ओळखता यावी यासाठी गावातील लोकांना आवाहन करून मुलांना निरनिराळ्या प्रसंगातून हे सामाजिक शिक्षण दिले जाते व त्या योगे शिक्षणाचे महत्व पटवून दिले जाते.

शोध मोहिमा / सहली

शहरी जीवनाशी ओळख व्हावी या दृष्टीने मुलांना विविध ठिकाणी नेले जाते प्रसंगी नाटक/सिनेमा दाखविला जातो. 'जाणता राजा' हे शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य मुलांना अत्तिशय आवडले. कधी निसर्ग सहलींना नेले जाते, मुले गाणी म्हणतात, वनभोजन करतात आणि निसर्ग सान्निध्यात रमतात व रोजचे आयुष्य काही काळासाठी पूर्ण विसरून जातात. अशाप्रकारे शहरी जीवनाशी ओळख होताना त्यांना निसर्गाशी असलेली बांधिलकी नव्याने जाणवून जाते.

शाळेचा शिक्षक वर्ग