लोक बिरादरी प्रकल्पापासून जिंजगाव साधारण २५ किलोमीटरवर आहे. "गोंड" समाजाचे लोक इथे राहतात. गावात एक तलाव होता पण तो खोल नव्हता. प्रकल्पाने तो खोल खणून त्याची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला. काम सुरु करण्यापूर्वी, ग्रामसभेबरोबर एक करार करण्यात आला. त्याची काही कलमे खालीलप्रमाणे होती.
१. दारूबंदी
२. तंबाखू, गुटखा, खर्रा बंदी
३. वृक्षतोडबंदी
४. शिक्षणाचा हक्क
५. शिकारबंदी आणि वन्य प्राण्यांचे संगोपन
६. तंटामुक्त गाव
कराराची प्रत मिळताच २० मे २०१६ ला कामाची सुरुवात झाली. अंदाजपत्रक साधारण १५ लाख रुपयांचे होते. १ लाख रुपये गावातून गोळा करण्यात आले. यामुळे, गावकऱ्यांत एक मालकीची भावना निर्माण झाली. काम ५ जून २०१६ ला पूर्ण झाले. पाण्याखाली आलेले क्षेत्र साधारण ४ हेक्टरचे आहे.
३२ फूट खोल आणि १६ फूट व्यासाची एक विहीर बांधण्यात आली. पाण्याची एक टाकीही बांधण्यात आली, जिची उंची २५ फूट आहे आणि साठवण क्षमता ५० हजार लिटरची आहे. ५ हॉर्स पॉवरचा (HP) एक सौरउर्जेवर चालणारा पंप विहिरीतील पाणी खेचून टाकीत भरतो.
जिंजगावात साधारण १०० घरे आहेत. प्रत्येक घरात पाण्याचा नळ देण्यात आला आहे.
गावासाठी एक सार्वजनिक सभागृह (गोटूळ) देखील ferrowcement तंत्राचा वापर करून बांधण्यात आले आहे. या तंत्रात विटांचा वापर केला जात नाही. हे सभागृह साधारण २ हजार चौरस फुटांचे आहे.
कामाचे नाव | खर्च (रुपये) |
---|---|
तलावाची खोली वाढवणे | १५ लाख |
विहीर बांधकाम | ६ लाख |
पाण्याची टाकी | १० लाख |
पाईपलाईन आणि नळाची जोडणी | १० लाख |
सार्वजनिक सभागृह (गोटूळ) | १० लाख |
सौरउर्जा पंप | ५ लाख |
सौरउर्जा उपकरणांसाठी कुंपण | १५ हजार |
एकूण | ५६ लाख १५ हजार फक्त |
२०१७ ला संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातच फार कमी पाऊस पडला. पण लोक बिरादरी प्रकल्पाने केलेल्या कामामुळे जिंजगावला त्रास झाला नाही. कमी पाऊस पडूनही त्या वर्षी जिंजगावच्या शेतकऱ्यांनी १००% पीक घेतलं. आता तर, ते दरवर्षी एकापेक्षा जास्त पीके घेतात, जे हे काम होण्यापूर्वी अशक्य होते.
दारात पाणी आल्यामुळे गावकऱ्यांनी घरातच शौचालय बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण गाव एका निरोगी वातावरणाकडे आगेकूच करत आहे.
गावात एक नवीन उद्योग सुरु व्हावा या उद्देशाने लोक बिरादरी प्रकल्पाने मत्स्यबीजदेखील पुरवले. मासेमारी व्यावसायिक स्तरावर सुरु करण्यात आली. प्रकल्पाने गावातील ५ तरुणांना पुण्याला एका महिन्याचे मासे साठवणीचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले. या तरुणांनी परत आल्यावर इतर गावकऱ्यांना प्रशिक्षण दिले. २०१८ च्या फेब्रुवारी महिन्यात रोज साधारण १०० किलो माशांची विक्री झाली. त्यावेळी, प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचा ठराविक भाग "गावाचे उत्पन्न" म्हणून दिला. हा निधी गावात विविध विकास कामे करण्यासाठी वापरण्यात आला.
प्रकल्पाने जिंजगावात एक आरोग्य केंद्रदेखील सुरु केले आहे. येथे प्राथमिक उपचार, रक्तदाब-वजन मापन, आधुनिक तपमापक अशा सुविधा उपलब्ध आहेत. या केंद्राची व्यवस्था गावातीलच श्री. राजेश तळांदे सांभाळतात. त्यांना लोक बिरादरी रुग्णालय, हेमलकसा येथे प्रशिक्षण मिळाले आहे. ते इतर आरोग्य केंद्र सेवकांप्रमाणेच, प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी लोक बिरादरी रुग्णालयाला महिन्याच्या कामाची माहिती देण्यासाठी येतात.
ग्रामविकास योजनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
जिंजगावच्या प्रगतीचे खरे शिल्पकार श्री. सीताराम मडावी आहेत. ते सेंद्रिय शेतीला (कुठल्याही कीटकनाशक/रासायनिक खते यांचा वापर न करणारी) प्रोत्साहन देतात. त्यांनी स्वतःच्या घरी एक वाचनालय देखील सुरु केले आहे, जे सर्वांसाठी सदैव खुले असते. यांत शेतीवरील भरपूर पुस्तके आहेत. ते स्वतः शेतकरी आहेत आणि SRI (System of Rice Intensification) पद्धतीचा वापर करून तांदळाचे उत्पादन घेतात.
भामरागड तालुक्याचे आणि जिल्ह्याचे कृषी अधिकारी यांनी श्री. सीताराम मडावी यांना शेतीच्या विविध अभ्यास दौऱ्यांवर पाठवले. त्यांनी हिवरे बाजार, राळेगणसिद्धी आणि केरळ यासारख्या अनेक ठिकाणी भेट दिली. या दौऱ्यांचा उपयोग त्यांनी शेतीबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळविण्यासाठी केला. त्यांनी सिंचन विभाग, वन विभाग आणि कृषी खात्याच्या सहकार्याने आतापर्यंत १८ शेततळी विकसित केली आहेत.
त्यांना संगणकाचेदेखील चांगले ज्ञान आहे. शेतीसंदर्भात बरेच व्हिडीओ त्यांनी बनविले आहेत. बहुतेक स्थानिकांना मराठी येत नाही. मग ते स्थानिक भाषेत (माडिया अथवा गोंड) या शेतकऱ्यांना समजावून सांगतात.
२०१२ ला, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी त्यांना "वसंत नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार" देऊन गौरविले. दूरदर्शनच्या "सह्याद्री" वाहिनीने देखील त्यांचा सत्कार केला आहे.
जिंजगावच्या गंभीर पाणीसमस्येबद्दल त्यांनी सरकारकडे तब्बल ६ वर्ष पाठपुरावा केला. पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामपंचायतीने "Sintex" पाण्याची टाकी बसविली पण पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपच जोडले नाहीत. त्यामुळे ती निरुपयोगी ठरली. एका सरकारी कचेरीत पाठपुरावा करताना ते प्रकल्पाचे श्री. अनिकेत आमटे यांच्या संपर्कात आले. वर दिलेली सर्व कामे करताना त्यांनी गावाचे संपूर्ण सहकार्य प्रकल्पाला मिळवून दिले. सर्व कामांची यशस्वी सांगता झाल्यावरही ते सगळीकडे बारीक लक्ष ठेवून असतात. मधुमेहामुळे हल्लीच त्यांची तब्येत फार बिघडली होती. पण हा आजारही त्यांना दैनिक कामांवर, जसे पंप चालू-बंद करणे, लक्ष ठेवण्यापासून रोखू शकला नाही. अशी कामे गावकऱ्यांना नेमून दिलेली आहेत.
प्रकल्पाबरोबर झालेल्या करारातील सर्व अटींचे पालन होत आहे ना, याबाबतही ते फार जागरूक असतात. दारूबंदीसाठी गावाने "महुआ" फुलांची संपूर्ण विक्री प्रकल्पाला करावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. शिक्षण हक्कासंदर्भात, जिंजगावची साधारण १७ मुलं लोक बिरादरी आश्रम शाळा, हेमलकसा येथे शिकत आहेत. प्रत्येक वर्षी गावातून २ मुलं शाळेत दाखल होतात.