माडिया-गोंड या आदिवासी जमातीचे वास्तव्य दंडकारण्य जंगलात, महाराष्ट्राच्या मध्य-पूर्व भागातील गडचिरोली जिल्ह्यात आहे. ही जमात कुशल कारागिर व शिकारी आहे. 'माडिया' या त्यांच्या मातृभाषेला स्वतःची लिपी नाही. महाराष्ट्राचा भाग असूनही माडिया भाषेचे मराठी किंवा हिंदीशी काहीही साम्य नाही. माडिया आदिवासी जमातीच्या स्वतःच्या वेगळ्या रीती परंपरा सण आहेत. ही जमात निसर्गालाच देव मानते व पुजते. लाल मुंग्यांची चटणी हा अन्न पदार्थ या लोकांचा फार आवडता. निसर्गातील प्रत्येक हलणारी वस्तू हे लोक खातात…खारींपासून साप-मगरींपर्यंत. मोहाच्या फुलांपासून ते दारू सुध्दा बनवतात.